ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांची हजेरी ‘बायोमेट्रिक’ने होत असताना आता यात निवासी डॉक्टरांसाठी ‘बायोमेट्रिक’ची सक्ती करण्यात आली आहे. याला निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने विरोध दर्शविला असून शुक्रवारी तसे पत्र अधिष्ठात्यांना देण्यात आले.
मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग सकाळी ८ वाजता सुरू होतो. मात्र, वरिष्ठांसह अनेक डॉक्टर ८ च्या ठोक्याला मेडिकलमध्ये राहत नव्हते. काही विभाग प्रमुखांचा तर १० वाजण्यापूर्वी मेडिकलमध्ये प्रवेश होत नव्हता. याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वारंवार दाखल होणाºया या तक्रारींबाबत पुराव्याअभावी कारवाई करणे शक्य होत नव्हते. अखेर २०१५ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर)े यात दखल घेत बायोमेट्रिक लावण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला याला अल्प प्रतिसाद मिळाला. परंतु अनेकांवर कारवाई झाल्याने आता ही प्रणाली सुरळीत सुरू आहे. निवासी डॉक्टरांचाही यात समावेश करून घेण्यासाठी अधिष्ठात्यांनी १६ फेब्रुवारी रोजी आदेश काढले. परंतु याला मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी विरोध दर्शविला.
-२४ तास सेवा
मेडिकलच्या ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. दिनेश शर्मा म्हणाले, ‘बायोमेट्रिक’हे शासन सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाºयांपासून ते कर्मचाºयांसाठी आहे. निवासी डॉक्टर हे तीन वर्षांसाठी असतात. या दरम्यान त्यांना २४ तास सेवा द्यावी लागते. सुटीही घेता येत नाही. जर फारच महत्त्वाचे काम असेल तरच आपल्या कामाची जबाबदारी दुसºया निवासी डॉक्टरांवर टाकली जाते. ‘बायोमेट्रिक’ची सक्ती इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नाही. ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या मानकानुसार ही पद्धत केवळ ‘रेसिडेंट फॅकल्टी’ला आहे, विद्यावेतन घेणाºया निवासी डॉक्टरांना नाही. यामुळे याला आमचा विरोध आहे. शुक्रवारी या संदर्भात तसे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. शनिवारी पुन्हा एक पत्र ‘एमसीआय’ व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देण्यात येईल, असेही डॉ. शर्मा म्हणाले.