प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज माफीचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 09:09 PM2023-01-10T21:09:20+5:302023-01-10T21:10:00+5:30
Nagpur News राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज राज्य सरकारने माफ करावे. तसेच कृषी पंपांचे वीज बिलही माफ करावे, अशा मागणीचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, आत्महत्या करू लागला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज राज्य सरकारने माफ करावे. तसेच कृषी पंपांचे वीज बिलही माफ करावे, अशा मागणीचा ठराव प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राणी कोठी येथे झाली. या बैठकीत एकूण सात ठराव संमत करण्यात आले. परदेशातून सोयाबीन आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले. धान उत्पादक शेतकऱ्यांनाही नाममात्र बोनस जाहीर करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारचा निषेधाचा ठराव घेण्यात आला. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती व नोकर भरती करण्याचा ठरावही घेण्यात आला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे तसेच या यात्रेसाठी परिश्रम घेणारे नेते व पदाधिकारी यांचे आभार करणारा ठराव घेण्यात आला. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर येथे पोहोचेल. त्यावेळी मोठी चळवळ उभी राहील. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘चलो श्रीनगर’चा नारा दिला.
सुरजागड लोह प्रकल्प तत्काळ सुरू करा
- गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे उच्चप्रतीच्या लोह खनीजाचा साठा आहे. या ठिकाणी भिलाई सारखा लोह प्रकल्प व्हावा, असा ठराव संमत करण्यात आला. सूरजागड प्रकल्प होऊच नये, अशी आमची भूमिका नाही. मात्र, येथे लोह प्रकल्प झाल्यास ३ लाख कोटींचा महसूल मिळू शकतो. मात्र, येथील खाणी नाममात्र दरात उद्योगपतींना दिल्या जात असतील तर ही लूट थांबवावी लागेल. यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन धोरण ठरविले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.