- योगेश पांडे नागपूर : १९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला, समोरचे चित्र स्वप्नवत होते. ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते. माझा शोधनिबंध वाचून जागतिक कीर्तीचा हा शास्त्रज्ञ मला भेटण्यासाठी व त्यांच्या मनातील एक शंका विचारण्यासाठी चक्क माझ्या दारी आला होता.मूळचे भारतीय असलेले संशोधक डॉ. आतिश दाभोळकर यांनी फ्रान्सहून बोलताना ‘लोकमत’जवळ ही आठवण सांगितली. ते म्हणाले, डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्या विविध शोधपत्रिका वाचून त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. १९९५ साली मी ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’मध्ये असताना ‘स्ट्रींग थिअरी’वरील माझा शोधनिबंध वाचून तेच मला शोधत माझ्या कार्यालयात आले. त्यानंतर पुढे त्यांच्याशी अनेकदा संपर्क आला.डॉ. दाभोळकर यांच्या प्रयत्नांतून २००१ साली मुंबईत झालेल्या ‘स्ट्रींग’ला डॉ. स्टीफन हॉकिंग उपस्थित होते. यावेळी त्यांचे सायन येथील षण्मुखानंद सभागृहात व्याख्यानदेखील झाले होते.डॉ. हॉकिंग यांना भारतीय संशोधकांविषयी विशेष आदर होता. जगभरात भारतीय संशोधक भौतिकशास्त्र, गणित, ‘स्ट्रींग थिअरी’, ‘ब्लॅक होल्स’ आणि ‘क्वॉन्टम् ग्र्रॅव्हिटी’ या क्षेत्रांमध्ये करत असलेल्या कार्याची त्यांना माहिती होती. त्यामुळे ते नेहमी भारतीयांबाबत गौरवोद्गार काढायचे, असे डॉ. दाभोळकर यांनी सांगितले.‘जिंदादील’ होते ‘हॉकिंग’जगाने नेहमी व्हीलचेअरवर बसलेले व विचारात गुंतलेले हॉकिंग पाहिले. मात्र, त्यांचे व्यक्तिमत्त्व दिलखुलास आणि काहीसे मिश्किलदेखील होते. स्वत:च्या मर्जीने ते हलू शकत नसतानादेखील समोरच्याला जगण्याची कला शिकवून जात. गंभीर वातावरणातदेखील हळूच एखादा ‘जोक’ ऐकवत सर्वांना हसायला भाग पाडत.एका मुलीला ‘मल्टिपल सेरॉसिस’ने ग्रासले होते व तिच्या आजोबांनी मला त्या मुलीवर लिहिलेली कविता डॉ. हॉकिंग यांना पाठविण्याची विनंती केली होती. मी अगदी सहज म्हणून त्यांना ती पाठविली व काही वेळातच त्या कवितेचे कौतुक करणारा त्यांना ‘मेल’ आला.
भारतीय संशोधकांविषयी आदर, फ्रान्सहून आतिश दाभोळकरांनी जागवल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 5:02 AM