नागपूर : शहरात जिकडे-तिकडे सिमेंटचे रस्ते पहायला मिळत आहेत. छोटी गल्ली असेल किंवा मोठा रस्ता सिमेंटचा असावा, अशी पद्धत रूढ झाली आहे. या रस्त्यांचे दुष्परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. मागील चार महिन्यांत सिमेंटच्या धुळीमुळे ५० टक्क्यांनी श्वसनरोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. या मागे वाहनांतील प्रदूषणही असल्याची माहिती एका अभ्यसाद्वारे ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.
-ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान वाढले प्रदूषण
डॉ. अरबट यांनी सांगितले की, ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान शहरातील हवेची गुणवत्ता (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) ही १४०-२१० च्या दरम्यान होती. वाढलेल्या या प्रदूषणामागे सिमेंट रस्त्यांवरील धूळ, बांधकामाची धूळ, वाहनांचे धूर या शिवाय, शहराजवळील ‘पॉवर प्लांट्स’, ‘कोळसा खदानी’, ‘मॅनिफॅक्चररिंग युनिट’ आदी मधून मोठ्या प्रमाणात ‘सल्फर डाय ऑक्साईड’, ‘नायट्रोजन ऑक्साइड’ आणि कणयुक्त प्रदूषके निघाल्याने अन्य ऋतूंपेक्षा २०-२५ टक्क्यांनी श्वसनरोगाच्या रुग्णांत वाढ झाली.
-टायरच्या घर्षणाने वाढता कणयुक्त प्रदूषके
टायर व सिमेंट रस्त्याच्या घर्षणामुळे कणयुक्त प्रदूषके निर्माण होतात, धूलिकण वातावरणात उडतात. याशिवाय या घर्षणामुळे ध्वनिप्रदूषणदेखील होते. तापमान शोषणाच्या स्वभावामुळे शहरी भागात स्थानिक तापमानवाढदेखील नोंदविल्या जात आहे. त्यामुळे जमिनीच्या स्तरावर ओझोनचे प्रमाण वाढून श्वसनविकारांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसून येत आहे.
-आरोग्यावर होतात हे परिणाम
वायुप्रदूषणामुळे श्वसननलिकेचे विकार, कफ वाढणे, शिंका येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ब्रॉन्कायटिस, अस्थमा-सीएओपीडीसारख्या विकाराला ‘ट्रिगर’ मिळणे, गळ्यात व नाकात त्रास होणे, हृदयविकार, त्वचेचे विकार, डोळ्यांचे विकार अशी लक्षणे सामान्यत: या प्रदूषणामुळे दिसून येत आहेत. ओझोनच्या वाढलेल्या स्तरामुळे मुख्यत: अस्थमाचा रुग्णांमध्ये अटॅक येण्याची शक्यता वाढते. याशिवाय धूम्रपान न करणाऱ्या २० टक्के लोकांना या प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका उद्भवतो.
-काय करावे
:: सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे
:: प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे
:: रस्त्यांवर मास्क वापरणे
:: एअर फिल्टरचा वापर करणे
:: लक्षणे दिसल्यास वैद्यकीय साहाय्यता घेणे
रस्त्यावर निघताना काळजी घ्या
शहरातील नागरिकांना रस्त्यावरील प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात श्वसनरोगांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी रस्त्यावर निघताना काळजी घ्यावी. शक्यतोवर मास्क घालावा. अस्थमा व अन्य श्वसनविकारांच्या रुग्णांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ