लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेले जिल्ह्यातील तब्बल ४८८ किमी लांबीपेक्षा जास्त असलेले ३५ इतर जिल्हा मार्ग (ओडीआर) व ५० ग्रामीण रस्त्यांची आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्यात आली आहे. यामुळे पुढे या रस्त्यांची सर्व जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग यांची राहणार आहे.जिल्ह्यातील हिंगणा, उमरेड, कुही, मौदा, नागपूर (ग्रा.), कामठी व भिवापूर या तालुक्यांतील तब्बल ४८८ वर किमीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांना दर्जोन्नती देऊन त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग घोषित करण्यात आले आहे. यात हिंगणा तालुक्यातील आठ इतर जिल्हा मार्ग व पाच ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील १७ इतर जिल्हा मार्ग व १८ ग्रामीण मार्गांचा प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून समावेश करण्यात आला आहे. नागपूर (ग्रा.) तालुक्यातील ३ इतर जिल्हा मार्ग व ११ ग्रामीण मार्ग, मौदा तालुक्यातील ४ इतर जिल्हा मार्ग व ४ ग्रामीण मार्ग तसेच कामठी तालुक्यातील ३ इतर जिल्हा मार्ग तसेच १२ ग्रामीण मार्ग अशा एकूण ८८ मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत झाले आहे. आजवर या सर्व रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे होती. मात्र आता या मार्गांना दर्जोन्नती प्राप्त झाल्यामुळे याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द झाली आहे. यामुळे जि.प.च्या अखत्यारित येणारे सध्या रखडलेल्या परिस्थितीत असलेल्या पांदण रस्त्यांत सुधार होणार आहे.
नागपूर जि.प.च्या ८५ रस्त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:44 AM