विधवा सुनेचा सांभाळ करणे सासू-सासऱ्याची जबाबदारी; हायकोर्टाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:36 AM2021-02-15T10:36:59+5:302021-02-15T10:37:19+5:30
Nagpur News विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला.
राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा वाटा असतो. त्यामुळे सासू-सासऱ्याने मयत मुलाची संपत्ती मिळवली असेल तर, विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी एका प्रकरणात दिला.
या प्रकरणातील सासू-सासऱ्याने मुलाच्या अपघाती निधनानंतर त्याच्या विम्याचे ४२ लाख ९८ हजार रुपये, ग्रॅच्युईटी व इतर काही लाभ मिळवले. परंतु, विधवा सुनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे सुनेने १० हजार रुपये महिना पोटगी मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय देऊन सुनेला ७ हजार ५०० रुपये मासिक पोटगी मंजूर केली. मयत मुलाची पुरेसी मिळकत सासू-सासऱ्याकडे आहे. सुनेने ती स्वत:चा सांभाळ करू शकत नसल्याचे सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत हिंदू वारसाहक्क कायद्यानुसार विधवा सुनेचा सांभाळ करण्याची पहिली जबाबदारी सासऱ्याची आहे असेही न्यायालयाने निर्णयात नमूद केले.
पतीचा सात महिन्यातच मृत्यू
प्रकरणातील दाम्पत्य मेघा व अमोल यांचे ३ मे २००७ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर सातच महिन्यात, म्हणजे, २१ फेब्रुवारी २००८ रोजी अमोलचे अपघातात निधन झाले. मेघाने पोटगीकरिता सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका खारीज झाल्यामुळे तिने उच्च न्यायालयात अपील केले.