लोकमत विशेष
आनंद शर्मा
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना रेल्वेगाड्यातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या प्रवाशांना आता दिड महिन्यात कोचमध्ये तयार केलेल्या रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ आणि भोजन मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे रेल्वेस्थानकाच्या बाहेर कोचमध्ये हे रेस्टॉरंट साकारण्यात येत आहे. या कामाची सुरुवात झाली असून आगामी काही दिवसातच प्रवाशांना खासगी कंपनीचे कर्मचारी कोचमधील रेस्टॉरंटमध्ये भोजन देताना दिसणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या बाहेरच्या परिसरात रेल्वेच्या कोचमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. हे रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी शहरातील एका नामवंत फुड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या फुड कंपनीने रेल्वेच्या तिजोरीत ४२ लाख रुपये जमा केले आहेत. नागपूर रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासीक इमारतीच्या समोर ऑटोरिक्षा पार्किंगच्या परिसरात रुळ टाकण्यासाठी सिमेंटचे स्लिपर रांगेत ठेवण्यात आले आहेत. या स्लिपरला आपसात जोडल्यानंतर त्यावर रेल्वेचे कोच चढविण्यात येणार आहे. त्यानंतर कोचचे रेस्टॉरंटमध्ये रुपांतर करण्याचे काम खासगी फुड कंपनी करणार आहे. या कामासाठी एक ते दिड महिन्याचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यानंतर या कोचमध्ये रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ, भोजन पुरविण्यात येणार आहे. संपुर्ण भारतीय रेल्वेच्या रेल्वेस्थानकात हा दुसरा प्रयोग आहे.
..............
रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटची झाली आठवण
नागपूर रेल्वेस्थानक परिसरात कोचमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याच्या उपक्रमामुळे रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंटची आठवण ताजी झाली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कडबी चौक येथील नॅरोगेज म्युझियमच्या खुल्या जागेत तत्कालीन डीआरएम शरदचंद्र जेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षांपुर्वी फिरते रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट तयार केले होते. परंतु तेंव्हापासून आजपर्यंत हे रेस्टॉरंट बंद आहे. अनेक फुड कॉन्ट्रॅक्टर आले आणि गेले. परंतु नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे हे रेस्टॉरंट बंद पडले. तर नागपूर रेल्वेस्थानकाच्या होम प्लॅटफार्मवर काही वर्षांपुर्वी रेल्वेच्या कोचमध्ये फुड स्टॉल तयार करण्यात आला होता. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो बंद करावा लागला. अशा स्थितीत या नव्या रेस्टॉरंटला कसा प्रतिसाद मिळतो हे आगामी काही दिवसातच कळणार आहे.
.........
दिड महिन्यात काम होणार पुर्ण
‘नागपूर रेल्वेस्थानकाच्या बाहेरच्या परिसरात खासगी कंपनी कोचमध्ये रेस्टॉरंट चालविणार आहे. कोच आणि रुळ रेल्वे प्रशासन देणार आहे. खासगी कंपनीने एका वर्षासाठी ४२ लाख रुपये रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. कोचमध्ये रेस्टॉरंट तयार करण्याचे काम एक ते दिड महिन्यात पुर्ण होणार आहे.’
-कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
........