लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी आयटीआय विद्यार्थ्यांच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा (आॅल इंडिया ट्रेड टेस्ट) निकाल जाहीर करण्यास मनाई केली.ही परीक्षा पुणे, नाशिक व नागपूर येथील काही निवडक केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून अन्य सर्व केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यावर आक्षेप घेऊन सेलेंद्र्र गुजर व कुणाल हुमणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. उद्यापासून आॅफलाईन तर, २० आॅगस्टपासून आॅनलाईन परीक्षेला सुरुवात होणार आहे. परिणामी, या परीक्षेवर ऐनवेळी स्थगिती दिल्यास मोठी अडचण निर्माण होईल ही बाब लक्षात घेता न्यायालयाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला परीक्षा घेण्याची परवानगी दिली, पण पुढील आदेशापर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई केली. तसेच, संचालनालय, केंद्रीय कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे महासंचालक, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद आणि राज्याच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावून यावर १४ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. आनंद परचुरे व अॅड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.तक्रारींची दखल नाही१६ जुलै २०१८ रोजी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सर्व आयटीआय महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहून आॅनलाईन परीक्षेवर आक्षेप विचारले होते. त्या आधारावर संचालनालयाने २७ जुलै रोजी काही आयटीआय संस्थांना आॅफलाईन परीक्षा घेण्याची परवानगी दिली. तसेच, यासंदर्भात ३० जुलै रोजी आदेश जारी करून पुणे, नाशिक व नागपूर येथील निवडक केंद्रांवर आॅफलाईन परीक्षा घेण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांसह इतरांनी याला विरोध केला होता. संचालनालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही.