लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागपूर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत. नागपुरात तिसरी लाट येण्याच्या मार्गावर असून, कोविड रुग्णांची संख्या आता दोन अंकांत पोहोचली आहे. त्यामुळे वेळीच दखल घेऊन निर्बंध लागू करावे लागतील. व्यावसायिक संघटना व हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसांत निर्बंध लागू केले जातील, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सायंकाळी जाहीर केले.
सोमवारी पालकमंत्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान तिसरी लाट रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यावर सहमती दर्शविण्यात आली. पालकमंत्री राऊत यांनी बैठकीनंतर सांगितले की, दुसरी लाट आली तेव्हा अशीच परिस्थिती होती. सुरुवातीला रुग्णांची संख्या दोन अंकांत होती. त्यामुळे तिसरी लाट दाखल झाल्याची ही चाहूल असू शकते. त्यामुळे वेळीच निर्बंध लागू करणे चांगले राहील; परंतु ते करीत असताना सर्वांशीच चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात निर्बंधांबाबत नियमावली स्पष्ट झालेली नाही; परंतु दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवणे आणि शनिवार व रविवारी सर्व बंद ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार केला जात असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना निर्बंध लागू राहणार नाहीत.