लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘ब्रेक द चेन’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करायला सुरुवात झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडस्ची उपलब्धता हे निकष ठरवून निर्बंध लावण्यात आले आहेत; परंतु कोरोना नियमांचे कठोरतेने पालन व लसीकरणाशिवाय याला महत्त्व नाही, असे स्पष्ट मत नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तवले आहे.
-या निर्बंधात रुग्ण वाढले, तर कठोर निर्णय आवश्यक -डॉ. देशमुख
वरिष्ठ फिजिशिअन डॉ. जय देशमुख म्हणाले, निर्बंध अंशत: शिथिल करण्यात आल्याने आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांचे पालन होणे व सर्वांचे लसीकरण ‘मस्ट’ आहे. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन मास्क तोंडावर लावण्याचेही बंधन असायला हवे. निर्बंधाचा या काळात ५ टक्क्यांनी जरी रुग्ण वाढले तरी पुन्हा कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे लसीकरणाची गती मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे, तिसरी लाट आल्यास याचा सर्वांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
-‘लसीकरण’ कोरोनाची ढाल -डॉ. अरबट
वरिष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ‘प्रिव्हेंशन’ गरजेचे आहे; परंतु आजही अनेक लोक मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुण्याचे नियम पाळत नाहीत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. शासनाने अंशत: निर्बंध शिथिल केले आहेत, याचा फायदाही होईल; परंतु यासोबतच व्यापक लसीकरण आवश्यक आहे. जे मागील दीड महिन्यापासून फारच मंदावले आहे. ‘व्हॅक्सिन’ ही कोरोनाची ढाल आहे. मात्र, जवळपास ८० टक्के लोक त्यापासून वंचित आहे.
-‘सुपर स्प्रेडर इव्हेंट’वर कठोर निर्बंध हवेत -डॉ. शिंदे
संसर्गतज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले, निर्बंधांचा फार जास्त फायदा होत नाही. मात्र, लोकांनी कोरोना नियमांचे पालन केल्यास त्याचा फायदा त्यांना स्वत:ला व दुसऱ्यांनाही होतो. कोरोनाच्या नियमात आणखी एका नियमाची भर पडली आहे. ती म्हणजे मधुमेह नियंत्रणात ठेवण्याची. महत्त्वाचे म्हणजे, ‘सुपर स्प्रेडर इव्हेंट’वर कठोर निर्बंध यायला हवेत.
-लसीकरण नसेल तर ‘अनलॉक’चा फायद होत नाही
श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात असतानाही आपल्याकडे लसीकरण मंदावले आहे. लसीकरण नसेल, तर ‘अनलॉक’चा फायदा होत नाही. लसीकरणाची गती वाढली पाहिले. महत्त्वाचे म्हणजे, ते खुल्या जागेत, गर्दी होणार नाही, अशाच ठिकाणी व्हायला हवे.