लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड डेल्टा प्लस वेरियंटच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले नवीन निर्बंध हे १९ जुलैपर्यंत कायम राहतील. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारने ‘कोविड डेल्टा प्लस वेरियंट’ प्रकरणे आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पूर्ण राज्यालाच लेव्हल ३ मध्ये टाकले आहे. त्यानुसार गेल्या २८ जूनपासून राज्यात नवीन निर्बंध लागू झाले आहेत.
यानुसार सर्व दुकाने ही दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. तसेच शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बाजार बंद राहील. दर आठवड्याला आढावा घेऊन याबाबतचा निर्णय जारी केला जातो. शुक्रवारीसुद्धा आढावा घेण्यात आला आणि पुढील १९ जुलैपर्यंत हे निर्बंध कायम ठेवण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आला आहे.