मोरेश्वर मानापुरे
नागपूर : महागाईवर नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केले. गव्हाच्या निर्यातबंदीपाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. तसेच डाळींच्या आयातीला परवानगी आणि सोयाबीन व सूर्यफुलाच्या आयातीवरील सीमाशुल्क शून्य टक्के केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खाद्यतेल दहा रुपये किलोने कमी होणार
सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत दरवर्षी २० लाख टन सोया तेल आणि २० लाख टन सूर्यफूल तेल आयात करावे लागेल. या निर्णयामुळे दोन्ही तेलाचे दर प्रति किलो दहा रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. देशात दरवर्षी १३० लाख टन सोया तेल आणि ४० लाख टन सूर्यफूल तेलाची आयात होते. २० लाख टनांनंतर आयात शुल्क लागणार काय, यावर संभ्रम असल्याचे व्यापारी अनिल अग्रवाल म्हणाले.
साखरेला गोडवा; भाव तीन रुपयांनी उतरणार
यावर्षी १०० लाख टनांपेक्षा जास्त साखर निर्यात करता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. पण सरकारची परवानगी घेऊन निर्यातीचा दुसरा मार्ग मोकळा आहे. अर्थात निर्यात बंदी काही प्रमाणात आहेत. या निर्णयामुळे किरकोळमध्ये साखरेचे दर दोन ते तीन रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसे पाहता मध्यपूर्व देशांमध्ये उच्चदर्जाच्या साखरेच्या तुलनेत मध्यम व हलक्या दर्जाच्या साखरेला मागणी आहे. त्यामुळे निर्यात बंदीचा व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचे व्यापारी किरीट पंचमतिया म्हणाले.
आयात खुली केल्याने डाळी स्वस्त
डाळींच्या वाढत्या किमतीवर प्रतिबंध आणण्यासाठी सरकारने डाळींची आयात खुली केली. त्यामुळे देशात सर्वच डाळींचे भाव घसरले. तूर, हरभरा, मूग, उडीद डाळींचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक विक्रीच तूरडाळीचे दर ९५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
- प्रताप मोटवानी, सचिव, धान्य बाजार असोसिएशन विदर्भ.
गहू पाच रुपयांनी स्वस्त
गव्हाच्या निर्यातबंदीमुळे गव्हाच्या दरवाढीला ‘ब्रेक’ लागला आणि सर्व प्रकारच्या गव्हाचे दर प्रतिकिलो तीन ते पाच रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पुढे दरवाढ होणार नाही.
- रमेश उमाठे, धान्य व्यापारी.
डिझेलच्या करकपातीने महागाई कमी
डिझेलचे दर कमी झाल्यामुळे मालवाहतुकीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे महागाई निश्चितच कमी होण्यास मदत होईल, शिवाय भाजीपाल्यांचे दरही कमी होतील, असे ट्रान्सपोर्टर कुक्कू मारवाह यांनी सांगितले.