लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची लक्षणे आता बदलली आहे. रुग्ण वाढणे धोकादायक असून पुढील काळात लोकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. रेल्वेत गर्दी कशी कमी करता येईल, त्यावर चर्चा सुरु आहे. लग्न, आंदोलन माध्यमातून येथेही गर्दी होत असून त्यावरदेखील आता काही बंधने आणावी लागतील. महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेनेच चालला असल्याचे चित्र असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
सायंकाळी पाच वाजेनंतर गर्दीचे प्रमाण जास्त दिसते. पुढील पाच ते सहा दिवस लोक कसे नियम पाळतात त्यावर सर्व काही निर्भर आहे. त्यानंतरच सरकार निर्णय घेईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सेलिब्रिटींसंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. संपुआ सरकारच्या वेळेस सेलिब्रिटींना महागाई दिसत होती. मात्र आता देशद्रोही ठरविण्याच्या भीतीने त्यांची तोंडे शिवल्या गेली आहेत.सामान्य लोकांच्या भरवशावर त्यांचे चित्रपट चालतात. त्यांच्याबाबत त्यांनी भावना तरी वक्तव्य कराव्यात, असे वडेट्टीवार म्हणाले