नागपूर : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांचे न्यायालय २८ जानेवारी रोजी जाहीर करणार आहेत. या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना, अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी एक आरोपी असून तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे. या गुन्ह्याच्या कटात त्याचा सहभाग असून त्याच्याविरुद्ध बालन्यायालयात खटला चालणार आहे. युगचे वडील डॉ. मुकेश चांडक हे दंत चिकित्सक असून त्यांचे दोसर भवन चौकात क्लिनिक आहे. युग हा सेंटर पॉर्इंट शाळेत शिकत होता. डॉ. चांडक यांच्या क्लिनिकचा कामावरून काढलेला नोकर राजेश दवारे याने आपला मित्र अरविंद सिंग याच्या मदतीने १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास युगचे अपहरण केले होते. युग शाळेतून बसने घरी परतताच ही घटना घडली होती. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात त्याचा निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह गवसला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्युपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी मेयो इस्पितळात करण्यात आले होते. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ‘युग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असे तो म्हणाला होता. हवेत स्वप्नांचे मनोरे चढवीत आरोपींनी खंडणीसाठी युगचा भयावह अंत केला होता. (प्रतिनिधी)५७ साक्षीदार तपासलेलकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीस १९ जानेवारी २०१५ पासून प्रारंभ झाला होता. डॉ. मुकेश चांडक यांची पहिली साक्ष तपासण्यात आली होती. आतापर्यंत सरकार पक्षाने ५० आणि बचाव पक्षाने ७ साक्षीदार तपासले आहेत. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा, त्यांचे सहकारी अॅड. मनोज दुल्लरवार, लिगल एडमार्फत मिळालेले आरोपी राजेश दवारे याच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. राजेश्री वासनिक, दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय यांनी बाजू मांडली.
अपहरण-खून खटल्याचा २८ जानेवारीला निकाल
By admin | Published: January 15, 2016 3:50 AM