लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परीक्षा न घेताही मूल्यांकनाच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. नागपूर विभागात ९९.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ७.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७० हजार ५१६ विद्यार्थिनींपैकी ७० हजार ३२२ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.७२ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९९.५१ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ४० हजार ८५९ पैकी १ लाख ४० हजार ३२५ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.
विभागात चंद्रपूर जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी सर्वांत जास्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून २४ हजार ७८१ पैकी २४ हजार ७३७ विद्यार्थी (९९.८२ टक्के) उत्तीर्ण झाले. नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी ९९.६१ टक्के इतकी आहे. तर गोंदियात सर्वांत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तेथील १८ हजार २५८ पैकी १८ हजार १४४ (९९.३७ टक्के) विद्यार्थीच यश संपादन करू शकले.
पुनर्परीक्षार्थ्यांचा रेकॉर्ड निकाल
बारावीच्या पुनर्परीक्षार्थ्यांचा निकालदेखील अपेक्षेहून खूप जास्त लागला आहे. विभागातील ६ हजार ५०१ पैकी ६ हजार ४६५ (९९.४४ टक्के) पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा - निकाल टक्केवारी (२०२१) - निकाल टक्केवारी (२०२०)
भंडारा - ९९.५४ % - ९३.५८ %
चंद्रपूर - ९९.८२ % - ९०.६० %
नागपूर - ९९.६१ % - ९२.५३ %
वर्धा - ९९.५९ % - ८७.४० %
गडचिरोली - ९९.७३ % - ८८.६४ %
गोंदिया - ९९.३७ % - ९४.१३ %