आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य सरकार संत्रा उत्पादकांना योजनांच्या माध्यमातून मदत आणि विविध उपक्रम राबवित आहे. त्यानंतरही त्यांना हव्या त्या सुविधा अजूनही मिळत नाहीत. कोल्ड स्टोरेजमध्ये उणिवा आहेत. पॅकेजिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि समक्ष वाहतूक यंत्रणेचा अभाव आहे. शेतात पोस्ट हार्वेस्टिंग ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नागपुरी संत्री उठून दिसत नाही अर्थात अन्यच्या तुलनेत नागपुरी संत्रा फिका पडतो. नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे, असे म्हटले जाते. पण बांगलादेशाव्यतिरिक्त अन्य देशात निर्यात होत नाही. पंजाबची किनू संत्री इंग्लंडमध्ये पोहोचली आहेत. नागपुरी संत्री युरोपमध्ये पोहोचवायची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि भक्कम मार्केटिंग करण्याची गरज आहे. संत्रा शेतीसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू असलेल्या तीन दिवसीय वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ‘आॅरेंज फार्मिंग : रिटेल व्हॅल्यू चेन’ या विषयावर आयोजित समूह चर्चेत नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले, यूपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर कौशिक, नॅशनल सेंटर फॉर कोल्ड-चेन डेव्हलपमेंटचे एचआरडी अॅण्ड को-आॅर्डिनेशन प्रमुख अंशुमन सिद्धांत, फ्यूचर सप्लाय चेन सोल्यूशन्स लिमिटेडचे बिझनेस हेड आनंद सेन, इस्त्राईलच्या कृषी तज्ज्ञ सीगालिट बेरेनझॉन यांनी भाग घेतला. द हिंदू बिझनेस लाईनचे विशेष प्रतिनिधी राहुल वाडके हे चर्चासत्राचे परीक्षक होते.