नागपूर : राज्याचे माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद गजाननराव सहस्त्रभोजने (९८) यांचे सोमवारी नागपूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. १९४३ ते १९५० या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आंध्र प्रदेश, बंगाल व आसाम प्रांत येथे प्रचारक होते. त्यानंतर त्यांनी विविध दैनिकांमध्ये पत्रकारिताही केली. सरकारी सेवेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बॅ. ए. आर. अंतुले व बाबासाहेब भोसले यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. निवृत्तीनंतर ते डॉ. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या तपोवन येथे सेवा देऊ लागले. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून ते नागपुरात आले. देहदान, रक्तदान यासाठी त्यांनी प्रचार कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. मंगळवारी, (दि. १४) सकाळी ११ वाजता दीनदयाल नगरातील गणेश मंदिराजवळील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल. अंत्यसंस्कार अंबाझरी घाट येथे करण्यात येतील.
उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
माहिती व जनसंपर्क खात्याचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक श्रीपाद सहस्त्रभोजने यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दु:खद आहे. नागपुरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता, त्यानंतर माहिती व जनसंपर्क विभाग आणि नंतर अनेक शासकीय विभागात त्यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. चार मुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणारे ते कदाचित एकमेव असावे. देहदान, रक्तदानाच्या क्षेत्रात त्यांनी सामाजिक कार्य केले. सरकारी सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी आंध्र प्रदेश, बंगाल आणि आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारून त्यांनी स्वत:ला पुन्हा संघकार्यात झोकून दिले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.