लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या सहायक उपनिरीक्षक (एएसआय) आणि सैन्यातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिला तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गिट्टीखदान आणि तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. निरीक्षक अशोक मेश्रामवर दाखल छेडखानीचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच हे प्रकरण घडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राजबहादूर सिंह चौहान (५९) रा. नटराज सोसायटी, गोरेवाडा सहा महिन्यापूर्वी शहर पोलिसातून सहायक उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाला आहे. पीडित ४१ वर्षीय महिलेच्या पतीचा २००४ मध्ये मृत्यू झाला. १ जून २००५ रोजी दुपारी महिला कौटुंबिक वादाची तक्रार करण्यासाठी पायदळ जात होती. दरम्यान, चौहानही त्याच मार्गावरून जात होता. महिलेने चौहानला लिफ्ट मागितली. लिफ्ट दिल्यामुळे त्यांची ओळख झाली. त्यानंतर चौहान महिलेशी गप्पा मारत होता. पोलीस कर्मचारी असल्यामुळे महिलेला चौहान आपली मदत करेल, असे वाटले. चौहानने महिलेस लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत राहण्यास सांगितले. महिलाही तयार झाली. त्यानंतर ती चौहानसोबत राहू लागली. चौहानने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सहा महिन्यापूर्वी चौहान सेवानिवृत्त झाला. त्यानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. चौहानने लग्न करण्यास आणि सोबत राहण्यास नकार दिला. महिलेने याबाबत गिट्टीखदान पोलिसात तक्रार दाखल केली. त्याची माहिती मिळताच चौहान फरार झाला. गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेतील आरोपी सैन्यात शिपाई पदावर आणि राजस्थान येथील रहिवासी प्रीतमसिंह वीरेंद्रसिंह तवर (२३) हा आहे. अमरावती येथील २१ वर्षाची युवती मार्शल आर्टची खेळाडू आहे. ती २०१९ मध्ये मार्शल आर्टसाठी कोचची शोध घेत होती. दरम्यान, फेसबुकवर तिची तवरशी ओळख झाली. सैन्यात तैनात असलेल्या तवरने आपण मार्शल आर्टचा कोच असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. तवरने लग्न करण्याची बतावणी करून युवतीला नागपूरला बोलावले. तोसुद्धा तिला भेटण्यासाठी नागपूरला आला. तवरने सेंट्रल एव्हेन्यू येथील पॅराडाईज हॉटेलमध्ये खोली बुक केली. तेथे लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. संपर्क साधल्यानंतर तवर आणि त्याचे कुटुंबीय युवतीला धमकी देऊ लागले. युवतीने तहसील ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार आणि धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तवरला अटक करण्यासाठी तहसील पोलीस राजस्थानला जाणार आहेत.