नागपूर : सिगारेटच्या पैशांच्या वादातून पत्नीवर हल्ला करणाऱ्या तरुणावर निवृत्त सीआरपीएफ जवानाने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला. जयतला येथील स्वस्तिक नगरमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या या घटनेत त्याच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
स्वस्तिक नगर येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय गणेश गनीराम प्रसादने २०१६ मध्ये सीआरपीएफमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली व तो अलाहाबाद बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात आहे. त्याच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. प्रसादची पत्नी चिंताबाई डेली नीड्सचे दुकान चालवते. पुरुषोत्तम उर्फ पप्पू हिरालाल सोनेकर (३७) आणि सुरेश ठाणेकर (५२) हे प्रसादच्या घराजवळ राहतात. बुधवारी सकाळी ६.२० वाजता प्रसादची पत्नी दुकानात असताना त्याचवेळी दोघेही प्रसादच्या दुकानात सिगारेट घेण्यासाठी आले. सुरेशने चिंताबाईंकडे २० सिगारेट मागितल्या. सिगारेट खरेदीवरून सुरेशचा चिंताबाईंसोबत वाद झाला. पत्नीचा आवाज ऐकून प्रसादही घराबाहेर पडला. सुरेशने त्याच्याशीदेखील वाद घातला व त्याला धमकी देत तो निघून गेला.
सुमारे अर्ध्या तासाच्या वादानंतर सुरेश आणि पप्पू परतले. त्यांच्याकडे एक काठी आणि एक कोयता होता. शिवीगाळ करत त्याने चिंताबाईला काठीने मारून जखमी केले. पत्नीचा आवाज ऐकून प्रसाद घराबाहेर आला व त्याचा दोघांशी वाद सुरू झाला. तिघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पप्पू व सुरेश यांनी प्रसादला जखमी केले. जखमी प्रसादने घरात जाऊन परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आणली व गोळीबार केला. खांद्यावर गोळी लागल्याने सुरेश जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात घबराट पसरली. लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. झोन १ चे डीसीपी लोहित मतानी, एमआयडीसीचे ठाणेदार उमेश बेसरकर तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिघाही जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्रसादविरोधात हत्येचा प्रयत्न तर पप्पू व सुरेशविरोधात हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आले.
गोळी लागल्याचे कळालेच नाही
प्रसादने गोळीबार केल्यावर मोटारसायकलवर मागे बसलेला सुरेश घाबरला आणि काही अंतरावर लपून बसला. खांद्यावर दुखापत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हात लावला असता गोळी अडकल्याचे त्याला समजले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी सुरेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले.