नागपूर : नागपूर शहर अन्नधान्य वितरण विभागात अधिकाऱ्यांची दोन पदे आहे. यातील अन्नधान्य वितरण अधिकारी १ हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. पण अजूनही त्यांचा शहर पुरवठा विभागावर पगडा आहे. त्यामुळे शहरातील २०० रेशन दुकानदारांचे परवाने वर्षभरापासून नुतनीकरण झाले नाही. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांचेकडून दुर्लक्ष होत असल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे चांगलेच फावत आहे.
नागपूर शहरात ६५० रेशन धान्य वितरणाची दुकाने आहे. दर तीन वर्षांनी त्यांना परवान्याचे नुतनीकरण करावे लागते. त्यासाठी आरबीआयमध्ये चालान भरल्यानंतर पुरवठा अधिकारी त्यांचा परवाना नुतनीकरण करून देतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त अधिकारी ३१ डिसेंबरपूर्वी सेवेत असताना त्यांनी ४५० दुकानदारांचे परवाने नुतनीकरण करून दिले. निवृत्तीनंतर त्यांनी शहर पुरवठा विभागाचा चार्ज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे दिला. विशेष म्हणजे शहरात अन्नधान्य वितरण अधिकारी २ हे कार्यरत होते. त्यांनाही डावलण्यात आले. याला आता वर्ष होत आहे. शहर पुरवठा विभागात अधिकारी असताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला का दिला, यासंदर्भात आक्षेपही घेण्यात आले होते. परंतु त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. शहर पुरवठा अधिकाऱ्याकडे परवाना नुतनीकरणाचे अधिकार नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी परवाने नुतनीकरण देणे गरजेचे होते. पण त्यांनी कुणाचाही परवाना नुतनीकरण करून दिला नाही. दिवाळीच्या दिवसात नागपूर पोलिसांनी एका रेशन दुकानात छापा मारला. दुकानातून धान्य जप्त करण्यात आले. त्या दुकानदारांचा परवाना नुतनीकरण नसल्यामुळे त्याला अजूनही पोलिसांचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे नुतनीकरण न झालेल्या दुकानदारांमध्ये कारवाईची भीती निर्माण झाली आहे. शहर पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला नुतनीकरणाचा अधिकार नसल्याने त्यांनीही हात वर केले आहे.
- सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या संघटनेचे कार्यालय विभागाच्या परिसरात
शहर पुरवठा विभागाच्या कार्यालय परिसरात सेवानिवृत्त अधिकाऱ्याने संघटनेचे कार्यालय थाटले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते कार्यालय अवैध आहे. शहरातील सर्व झोनच्या अधिकाऱ्यावर त्याचा पगडा आहे. कुणाच्या बदल्या करायच्या इथपासून काम होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शहर पुरवठा विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी रेशन दुकानदारांची आहे.