नागपूर : घर भाड्याने देण्याची ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीची एकाने ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतिश चिमलवार (६५, श्रीरामनगर) यांनी ‘ओएलएक्स’वर त्यांचे घर भाड्याने देण्यासंदर्भात जाहिरात दिली होती. त्याच त्यांचा मोबाईल क्रमांकदेखील होता. ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी केली.
दिल्लातून कामठीत बदली झाल्याने तातडीने घर हवे असल्याचे त्याने सांगितले. त्याने लष्कराशी संबंधित त्याची कागदपत्रेदेखील चिमलवार यांना पाठविले. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने दोन महिन्यांचे आगावू भाडे देण्याच्या नावाखाली १६ हजार रुपये पाठवितो असे सांगून १ रुपयाच पाठविला. चिमलवार यांनी एकच रुपया मिळाल्याचे सांगताच त्याने त्यांना पेटीएमचा क्यूआर कोड पाठविण्यास सांगितले. त्याने यस बॅंकेचा खाते क्रमांक व आएफसी कोड नमूद करून तो टाकण्यास सांगितले.
चिमलवार यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून १५ हजार ९९९ रुपये वळते झाले. चिमलवार यांनी त्याला ती रक्कम परत मागितली असता त्याने तशीच प्रक्रिया करण्यास सांगितली व त्यांच्या दोन बॅंक खात्यातून एकूण १ लाख ९१ हजार ९९६ रुपयांची रक्कम त्याच्या यस बॅंकेच्या खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर त्याने फोनच बंद केला. चिमलवार यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात संबंधित बॅंक खातेधारकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौकशीदरम्यान यस बॅंकेच्या खातेधारकाचे नाव मयंक नागर असल्याचे समोर आले आहे.