राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयातील आठ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार असून, त्यात मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्यासह न्या. भूषण धर्माधिकारी, न्या. रवी देशपांडे, न्या. प्रदीप देशमुख, न्या. किशोर सोनवणे, न्या. नूतन सरदेसाई, न्या. मुरलीधर गिरटकर व न्या. सोपान गव्हाणे यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी हे सर्व न्यायमूर्ती वेगवेगळ्या तारखांना वयाची ६२ वर्षे पूर्ण करणार आहेत.११ फेब्रुवारी १९५८ जन्मतारीख असलेले न्या. देशमुख १० फेब्रुवारी २०२० रोजी, २४ फेब्रुवारी १९५८ जन्मतारीख असलेले न्या. नंदराजोग २३ फेब्रुवारी २०२० रोजी, २८ एप्रिल १९५८ जन्मतारीख असलेले न्या. धर्माधिकारी २७ एप्रिल २०२० रोजी, २ जून १९५८ जन्मतारीख असलेले न्या. गव्हाणे १ जून २०२० रोजी, ११ जून १९५८ जन्मतारीख असलेले न्या. सोनवणे १० जून २०२० रोजी, १९ आॅगस्ट १९५८ जन्मतारीख असलेल्या न्या. सरदेसाई १८ आॅगस्ट २०२० रोजी, १० आॅक्टोबर १९५८ जन्मतारीख असलेले न्या. गिरटकर ९ आॅक्टोबर २०२० रोजी तर, ६ नोव्हेंबर १९५८ जन्मतारीख असलेले न्या. देशपांडे ५ नोव्हेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त होतील. मुंबई उच्च न्यायालयाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ न्यायमूर्तींची पदे मंजूर आहेत. सध्या ५५ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ७० न्यायमूर्ती कार्यरत असून, २४ पदे रिक्त आहेत. हे आठ न्यायमूर्ती सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.
पुढच्या वर्षी आठ न्यायमूर्ती सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या आणखी वाढेल. त्याचा न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होईल. त्यामुळे नवीन नियुक्त्यांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु, नवीन नियुक्त्या करताना पात्रतेचे कठोरतेने परीक्षण व्हावे, अशी अपेक्षा आहे.- अॅड. शशिभूषण वहाणे,वरिष्ठ वकील, हायकोर्ट.
हे वर्ष ठरले लाभदायकहे वर्ष उच्च न्यायालय न्यायमूर्ती नियुक्त्यांच्या बाबतीत लाभदायक ठरले. यावर्षी या न्यायालयाला ११ अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले. आॅगस्टमध्ये पुष्पा गणेडीवाला, अविनाश घरोटे, नितीन सूर्यवंशी, अनिल किलोर व मिलिंद जाधव यांची तर, डिसेंबरमध्ये मुकुंद सेवलीकर, वीरेंद्रसिंग बिष्ट, बी. यू. देबडवार, मुकुलिका जवळकर, सुरेंद्र तावडे व नितीन बोरकर यांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. २०१८ मध्ये या न्यायालयाला केवळ चार अतिरिक्त न्यायमूर्ती मिळाले होते. त्यात श्रीराम मोडक, एन. जे. जमादार, विनय जोशी व राजेंद्र अवचट यांचा समावेश आहे.