लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे. व्याज १० आॅगस्ट २०१३ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू होणार आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व स्मिता चांदेकर यांनी हा निर्णय दिला. नरेंद्र व्यास असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते मोहननगर येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, व्यास यांनी ठाकरे फॅब्रिकेशनला फ्लॅटची दारे, खिडक्या व गॅलरीसाठी ५८ रुपये किलो दराने ग्रील तयार करण्याचे काम दिले होते. त्याकरिता १० आॅगस्ट २०१३ रोजी ठाकरे फॅब्रिकेशनला १० हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर द्यायचे ठरले होते. ग्रील एक महिन्यात तयार करून फ्लॅटमध्ये लावून द्यायच्या होत्या. परंतु, ठाकरे फॅब्रिकेशनने निर्धारित वेळेत काम पूर्ण केले नाही. दरम्यान, २५ नोव्हेंबर २०१३ रोजी व्यास यांच्या घरी ७ लाख २० हजार रुपयाची चोरी झाली. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर व्यास यांनी घर बदलले व ठाकरे फॅब्रिकेशनला १० हजार रुपये २ टक्के मासिक व्याजासह परत मागितले. ठाकरे फॅब्रिकेशनने त्यांची मागणी मान्य केली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली व ठाकरे फॅब्रिकेशनकडून चोरीच्या रकमेसह एकूण ९ लाख १५ हजार ९८० रुपये मिळण्याची मागणी केली. मंचने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला.
ग्राहकाचे १० हजार ४ टक्के व्याजाने परत करा; ग्राहक मंचचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 10:52 AM
तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे.
ठळक मुद्देठाकरे फॅब्रिकेशनला चपराक