नागपूर : साेमवारी सायंकाळच्या रिपरिपीनंतर थांबलेल्या पावसाने मंगळवारी सकाळ हाेताच पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे झाेपेतून जागे हाेताच दाराबाहेर पडणाऱ्या पावसाला पाहून लाेकांचा चेहरा वैतागवाना झाला. पाऊस परत जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना ‘ताे कधी एकदा निघून जाताे’, अशी भावना झाली आहे.
सायंकाळच्या हलक्या सरीनंतर रात्रभर आकाश ढगाळलेले हाेते; मात्र दरराेज सकाळी ऊन पडेल, या अपेक्षेत असलेल्या नागरिकांना पावसाने झटका दिला. सकाळपासूनच जाेरात हजेरी लावली. सकाळी १० वाजतापर्यंत ही रिपरिप सुरू हाेती. दाेन-अडीच तासांच्या सरींमुळे नागपूरला दिवसभरात ३० मि.मी. पावसाची नाेंद झाली. सकाळपर्यंत ताे ५.६ मि.मी. एवढा हाेता. गाेंदिया जिल्ह्यातही पावसाचा त्रागा कायम हाेता. दिवसभरात तेथे २३ मि.मी. पाऊस झाला. यासह सकाळपर्यंत वर्धा १४.४, गडचिराेली २६.६, बुलडाणा २८, अकाेला १३ व अमरावतीत ४ मि.मी. पाऊस झाला. मंगळवारी दिवसा मात्र या जिल्ह्यात उघाड हाेता. भंडाराच्या तुमसरमध्ये सर्वाधिक ३६.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली.
केरळ व आसपासच्या परिसरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले असून ते विदर्भ, मराठवाडा हाेत मध्य प्रदेशच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्या प्रभावाने विदर्भ विदर्भात १२ व १३ ऑक्टाेबरला काही ठिकाणी विजा व ढगांच्या गडगडाटासह पाऊस हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर उघडीप पडेल; मात्र १६ ते १८ ऑक्टाेबरलाही पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. दरम्यान पावसाळी वातावरणामुळे बहुतेक जिल्ह्यात पारा काहीअंशी खाली घसरला. पाऊस येत असला तरी ऑक्टाेबरच्या उष्णतेचाही लाेकांना त्रास हाेत आहे.