लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्ते ग्राहक लालदास धकाते व रूपेश धकाते यांना १८ लाख ५६ हजारातील १६ लाख ७१ हजार रुपये २४ टक्के तर, १ लाख ८५ हजार रुपये ९ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अष्टविनायक डेव्हलपर्सला दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कम अष्टविनायक डेव्हलपर्सनेच द्यायची आहे. आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी अष्टविनायक डेव्हलपर्सला हा दणका दिला.
२४ टक्के व्याज १३ जून २०११ पासून तर, ९ टक्के व्याज १८ नोव्हेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अष्टविनायक डेव्हलपर्सला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, तक्रारकर्त्यांनी अष्टविनायक डेव्हलपर्सच्या बेसा येथील गृह योजनेतील एक सदनिका १६ लाख ७१ हजार रुपयात खरेदी करण्यासाठी २७ जून २०११ रोजी करार केला. तसेच, अष्टविनायक डेव्हलपर्सला विक्रीपत्र नोंदणी व इतर शुल्कासह एकूण १८ लाख ५६ हजार रुपये अदा केले. परंतु, अष्टविनायक डेव्हलपर्सने तक्रारकर्त्यांना सदनिकेचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. तसेच, आवश्यक कायदेशीर परवानग्याही घेतल्या नाही. योजनेचे अर्धवट काम करून पुढील काम थांबवण्यात आले. परिणामी, तक्रारकर्त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने अष्टविनायक डेव्हलपर्सला नोटीस बजावली. परंतु, नोटीस तामील होऊनही ते आयोगासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे तक्रारीवर एकतर्फी कारवाई करण्यात आली व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता सदर निर्णय देण्यात आला.