नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ७ लाख १ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तिरुमला डेव्हलपरला दिला. व्याज १९ मे २०११ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली. ही रक्कम तिरुमला डेव्हलपरनेच द्यायची आहे.
विलास कन्नमवार असे ग्राहकाचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तिरुमला डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच, निर्णयाचे उल्लंघन केल्यास पुढील प्रत्येक दिवसाकरिता २५ रुपये अतिरिक्त नुकसान भरपाई लागू होईल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तिरुमला डेव्हलपरच्या भागीदारांमध्ये महेंद्र गवई, विजय शेळके, शैलेंद्र जयस्वाल व सुरेश डोईफोडे यांचा समावेश आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, कन्नमवार यांनी तिरुमला डेव्हलपरच्या मौजा शिरुर, ता. हिंगणा येथील ले-आऊटमधील एक भूखंड ११ लाख ६६ हजार ८७४ रुपयांत खरेदी करण्यासाठी जानेवारी-२०११ मध्ये करार केला. त्यानंतर डेव्हलपरला १९ मे २०११ पर्यंत वेळोवेळी एकूण ७ लाख १ हजार रुपये दिले. तसेच, भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली. परंतु, त्यांच्या मागणीला प्रतिसाद देण्यात आला नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. डेव्हलपरने आयोगाची नोटीस तामील होऊनही स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजेरी लावली नाही. करिता, तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आला.