नागपूर : तक्रारकर्त्या महिला गुंतवणुकदाराचे २१ लाख १२ हजार ५४० रुपये १२ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रविराज इन्व्हेस्टमेंट ॲण्ड स्ट्रॅटेजीज पतसंस्थेला दिला आहे. व्याज ३१ मार्च २०२२ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.
नमिता राय असे महिला गुंतवणुकदाराचे नाव असून त्या एम. बी. टाऊन येथील रहिवासी आहेत. आयोगाने त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी २० हजार रुपये भरपाईदेखील मंजूर केली आहे. ही रक्कम रविराज इन्व्हेस्टमेंटनेच अदा करायची आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी रविराज इन्व्हेस्टमेंटला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राय यांनी रविराज इन्व्हेस्टमेंटमध्ये संबंधित रक्कमेच्या चार मुदत ठेवी केल्या होत्या. त्या ठेवी ३१ मार्च २०२२ रोजी परिपक्व झाल्या. त्यानंतर राय यांना ठेवी परत देण्यात आल्या नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. आयोगाचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्या न्यायपीठाने तक्रारीवर सुनावणी केल्यानंतर रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.