लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : एकीकडे शासन व प्रशासनाच्यावतीने काेराेना प्रतिबंधक लसीकरणाबाबत गाजावाजा व प्रसिद्धी केली जात आहे. दुसरीकडे, लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांना लस नसल्याचे सांगत केंद्रावरून परत पाठविले जात आहे. हा प्रकार कळमेश्वर शहरातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी (दि. २५) अनेकांनी अनुभवला.
कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, येथे १८ ते ४५ वर्षे वयाेगटातील नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. परिणामी, लस घेण्यासाठी या वयाेगटातील अनेकांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. या केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन नाेंदणी करणाऱ्या प्रत्येकी १०० याप्रमाणे पहिल्या २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. उर्वरित नागरिकांना लसींचा साठा संपल्याचे सांगून परत पाठविण्यात आले.
राेज २०० नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याने कळमेश्वर शहराची लाेकसंख्या लक्षात घेता हा वेग अतिशय संथ असल्याची प्रतिक्रिया अनेक तरुणांनी व्यक्त केली. याबाबत शासन, प्रशासन व आराेग्य विभागाने काेणतीही पूर्वसूचना आजवर दिली नाही. तशा सूचनाही लसीकरण केंद्रावर लावण्यात आल्या नाहीत. केंद्रावर चाैकशी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी कर्मचारी असभ्य व असंबद्ध शब्दात बाेलतात, असा आराेपही शहरातील तरुणांनी केला. दुसरीकडे, प्रशासनाने पुरेशा लसींचा साठा उपलब्ध करून देत लसीकरणाचा वेग वाढवावा आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी साैजन्याने वागत सहकार्य करावे, असे आवाहन कळमेश्वर शहरातील तरुणांनी केले आहे.
...
आमच्याकडे लसींचे राेज २०० डाेस येतात. ते ऑनलाईन व ऑफलाईन नाेंदणी करणाऱ्यांना प्रत्येकी १०० याप्रमाणे द्यावे लागतात. आम्ही जिल्हा प्रशासनाला ऑनलाईन व ऑफलाईसाठी प्रत्येकी २०० प्रमाणे ४०० डाेस मागितले आहेत.
- डाॅ. प्रीती इंगळे, वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.
...
मी शुक्रवारी माझ्या कुटुंबीयांना घेऊन लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेलाे हाेताे. लस उपलब्ध नसल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी आम्हाला परत पाठविले. याबाबत कुणीही माहिती अथवा सूचना देत नसल्याने हेलपाटे मारावे लागतात. कर्मचारी असंबद्ध माहिती देतात.
- आशिष कुकडे,
नागरिक, कळमेश्वर.