नागपूर : विविध कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या ३२ दाम्पत्यांचे लोक न्यायालयामध्ये मनोमिलन झाले. त्यांनी सामंजस्याने वाद मिटवून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.
कुटुंब न्यायालयामध्ये शनिवारी लोक न्यायालय आयोजित करण्यात आले होते. त्यात आपसी सहमतीने वाद संपविण्यासाठी एकमेकांपासून दुरावलेल्या ८२ दाम्पत्यांना बोलावण्यात आले होते. दरम्यान, ३२ दाम्पत्यांचे संसार वाचविण्यात यश मिळाले. त्या दाम्पत्यांनी त्यांच्यातील वादाला सहमतीने तिलांजली दिली. दाम्पत्यांचे मनोमिलन घडवून आणण्याकरिता प्रत्येकी तीन सदस्यांचे चार पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात सेवानिवृत्त न्यायाधीश एन. एन. साखरकर, ओ. बी. वर्मा, के. व्ही. सेदानी, अशोक मत्ते, ॲड. अस्मिता तिडके, ॲड. अख्तर नवाब अन्सारी, ॲड. हेमराज साखरे, ॲड. मैथिली कान्हेरे, विवाह समुपदेशक करुणा महंतारे, डी. के. राऊत, संजीवनी अरखेल व ज्योती मत्ते यांचा समावेश होता. लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी कुटुंब न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मंगला ठाकरे, न्या. व्ही. बी. पाठक, न्या. एम. आर. काळे, न्या. प्र. कृ. अग्निहोत्री, प्रभारी प्रबंधक उषा नायडू, अधीक्षक महेश आडेपवार, सुनील बाळबुधे, विश्वजित सुरकार आदींनी परिश्रम घेतले.