लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - वेगवेगळ्या मालमत्ता अन् जमिनींची अनेकांना विक्री करून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा कुख्यात ठगबाज गोपाल लक्ष्मण कोंडावार (वय ५९) याचा पुन्हा एक कारनामा उघड झाला. दुसऱ्याच्या भूखंडांना स्वत:च्या मालकीचे भासवून कोंडावारने ले-आऊट मालकाला १ कोटी, ३० लाखांचा गंडा घातला आहे. शनिवारी या प्रकरणात सदर पोलीस ठाण्यात कोंडावारविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नंदकुमार खटमल हरचंदानी (वय ६८, रा. बैरामजी टाऊन) हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी माैजा पांजरी लोधी येथील अजय पाटणी यांची तसेच सुकळी येथील अग्रवाल यांची जमीन विकत घेतली होती. त्यात ले-आऊट टाकून हरचंदानी यांनी आरोपी गोपाल कोंडावारला ते विकण्यासाठी दिले. कोंडावार त्यावेळी वाशी (नवी मुंबई)च्या रहेजा रेसिडेन्सीमध्ये राहत होता. कोंडावारने या जमिनीवर जगदंब गुलमोहर नावाने नवीन ले-आऊट टाकले आणि तेथील १३४ भूखंड परस्पर विकले. संबंधित कागदपत्रांवर हरचंदानी यांच्या नावे बनावट सह्या केल्या आणि त्यांना सुमारे १ कोटी, ३० लाख, ९९,२४३ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार उघड झाल्यानंतर हरचंदानी यांनी कोंडावारकडे विचारणा केली असता त्याने असंबंद्ध उत्तरेे देऊन त्यांची बोळवण केली. त्यामुळे हरचंदानी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. ५ जुलैपासून सुरू असलेल्या या अर्जाची चाैकशी झाल्यानंतर शनिवारी सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
----
हडपलेली संपत्ती कुठे दडवली ?
कुख्यात कोंडावारने वेगवेगळ्या पद्धतीने नागपूर तसेच बाहेरच्या अनेक लोकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. गेल्या चार महिन्यात त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल झाले असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने हडपलेली कोट्यवधींची संपत्ती कुठे दडवून ठेवली, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोंडावारने लोकांची फसवणूक करून मुंबई, पुण्यासह विविध महानगरात कोट्यवधींची आलिशान संपत्ती विकत घेऊन ठेवल्याची चर्चा आहे.
----