-मेयो रुग्णालयाच्या शवागारातील प्रकार : तहसील ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत महिलेच्या अंगावरील दागिने अज्ञात भामट्याने लंपास केले. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ठरलेली ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर तहसील पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केला.
सागर बागडकर (३२, रा. खापरखेडा) यांच्या तक्रारीनुसार,
सागर यांच्या आई पुष्पा बागडकर (५५) यांना गेल्या महिन्यात उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १६ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांचे पार्थिव शवागारात पाठविण्यात आले. अज्ञात भामट्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने काढून घेतले. शोकविव्हळ बागडकर कुटुंबीयांचे त्यावेळी या संतापजनक प्रकाराकडे लक्ष गेले नाही. नंतर मात्र पुष्पा बागडकर यांच्या अंगावरचे दागिने मृत्यूच्या वेळी त्यांच्या अंगावर होते, हे लक्षात आले. मृत्यू झाल्यानंतर अज्ञात भामट्याने ते दागिने काढले, हेदेखील त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सागरने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात मंगळवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. ही घटना चर्चेला आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या या प्रकरणात कोण आरोपी आहे, त्याची तहसील पोलीस चौकशी करीत आहेत.
---