न्यायालय : पितृमोक्ष अमावस्येच्या दिवशीचा दसरा रोड महाल येथील थरार, नऊ वर्षीय मुलीची साक्ष ठरली महत्त्वपूर्णनागपूर : मुलाच्या आत्महत्येचा सूड म्हणून त्याच्या मित्राची हत्या करणाऱ्या एका ६२ वर्षीय वृद्धाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात मृताच्या नऊ वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. ही घटना दोन वर्षांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसरा रोड महाल येथे घडली होती. सुरेश साधूजी घोगरे असे आरोपीचे नाव असून, तो दसरा रोड महाल येथील रहिवासी होता. शैलेश रामकृष्ण जुनघरे (३६), असे मृताचे नाव होते. तो दसरा रोड गोंधळीपुरा येथील रहिवासी होता. खुनाची घटना २३ सप्टेंबर २०१४ रोजी पितृमोक्ष अमावस्येच्या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी अशी, घोगरे आणि जुनघरे या दोन्ही कुटुंबांमध्ये घरोब्याचे संबंध होते. सुरेश घोगरे याचा मुलगा जितेंद्र ऊर्फ जितू घोगरे (२५) याचे दररोजच शैलेश जुनघरेच्या घरी येणे-जाणे होते. शैलेशसोबत जितूचे अगदी जवळचे संबंध होते. २९ एप्रिल २०१४ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जितूने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आपल्या मुलाच्या आत्महत्येला शैलेशच कारणीभूत असल्याचा समज सुरेश घोगरे याने करून घेतला होता. घटनेच्या दिवशी २३ सप्टेंबर रोजी शैलेश जुनघरे हा आपल्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असताना सुरेश घोगरे हा आपल्या घरून भाजी कापण्याचा चाकू घेऊन आला होता. त्याने शैलेशला आवाज देऊन घराबाहेर बोलावले होते. अचानक त्याने शैलेशच्या छातीवर चाकूने जोरदार वार केला होता. त्याच वेळी शैलेश हा जोरजोराने ओरडत मनोहर रेणके याच्या घरासमोर गप्पा करीत असलेल्या लुकेश किशोर पवार याच्याकडे धावला होता. शैलेशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून पवार आणि राजेश रेणके हे शैलेशला वाचविण्यास धावले असता घोगरे याने पवारवरही चाकूने वार केला होता. परंतु त्याचा वार पवारने हुकवला होता. दोघांनीही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला होता. शैलेशला आधी खासगी इस्पितळात आणि नंतर मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला होता. लुकेश पवार याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून सुरेश घोगरे याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक ए. आर. जगताप यांनी तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपीविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात प्रत्यक्ष खटल्याच्या सुनावणीच्या वेळी १५ साक्षीदार तपासण्यात आले. मृताची नऊ वर्षांची मुलगी अनुष्का हिने धडधडीत साक्ष दिली होती. तिची साक्ष महत्त्वाची ठरली. या मुलीची साक्ष आणि इतर साक्ष पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी सुरेश घोगरे याला शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील उषा गुजर (माणिकपुरे) यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल मोहन चांदेकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)
आत्महत्येचा ‘बदला’ हत्या, वृद्धास जन्मठेप
By admin | Published: July 01, 2016 2:47 AM