नागपूर : ब्रह्मपुरी ते नागपूरदरम्यान असलेल्या ८ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून, नागपूर ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या समोरून व चंद्रपूर, नागपूर ग्रामीण ‘एलसीबी’च्या डोळ्यांदेखत कोट्यवधी रुपयांची रेती चोरी होत आहे. पोलिसांबरोबरच रेती चोरीसाठी महसूल विभागही जबाबदार आहे. जो विभाग सरकारला महसूल गोळा करून देतो, त्याच विभागातील अधिकारी रेती चोरीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे रेती चोरीतून कोट्यवधींचा सरकारचा महसूल बुडतो आहे.
अवैध रेती वाहतुकीच्या मार्गावर जसे पोलिस ठाणे येतात, तसेच तहसील कार्यालये, ‘एसडीओ’चे क्षेत्रही येते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही व ब्रह्मपुरीतच रेतीघाट आहेत. सिंदेवाहीतून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होते. चिमूर तहसीलमधून रेती चोरीचे ट्रक भरधाव धावतात. तर उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी व चिमुर यांच्या अंतर्गतही हे क्षेत्र येते. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातही उपविभागीय अधिकारी उमरेड व तहसीलदार उमरेड यांच्या क्षेत्रातून चोरीच्या रेतीची वाहतूक होते. विशेष म्हणजे, या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना रेतीघाटावर होत असलेले अवैध उत्खनन व चोरीच्या रेती वाहतुकीवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत.
सोंदरी घाटाच्या संदर्भातच उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना नदीतून पोकलेन, जेसीबीद्वारे रेतीचा उपसा होत असून, १२ ते १५ फुटांचे खड्डे पडलेले असल्याने स्वत: मोक्यावर जाऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे लेखी निर्देश दिले होते; पण कुठलीच कारवाई झाली नसल्याची स्थानिक तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे खनिकर्म विभागाचे अधिकारीही घाटावर जाऊन कारवाई करू शकतात; पण विभागाचे अधिकारी पैसा न मिळाल्यामुळे घाट बंद ठेवतात. पैसा मिळाला की, घाट सुरू करतात. सोमवारी खनिकर्म विभागाने याच कारणाने दिवसभर घाट बंद ठेवले होते. समाधान झाल्यानंतर रात्री ११ नंतर घाट सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नायब तहसीलदार ट्रक थांबवितात; पण तडजोड करून सोडतात
‘लोकमत’चे पथक रेती चोरीची पोलखोल करण्यासाठी उमरेड मार्गावरून फिरत असताना ‘डब्ल्यूसीएल’जवळ सकाळीच नायब तहसीलदार शासनाची गाडी उभी करून वाहने थांबविताना दिसून आले. सकाळी सकाळी ते एकटेच कारवाई करण्याचे धाडस करीत होते. त्यांनी गाड्या थांबविल्या; पण कारवाई न करता तडजोड करून गाड्या सोडून दिल्या, असे सूत्रांनी सांगितले. नागभिड रस्त्यावरही नायब तहसीलदाराने मंगळवारी रात्री ३ ट्रक थांबविले. मात्र, कारवाई न करता तडजोड करून सोडून दिले. अधिकारी रस्त्यावर उतरतात. मात्र, कारवाई न करता तडजोड करून सोडून देतात, हे नेहमीचेच असल्याचे मोटरमालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे रात्रभर रेती चोरीचे ट्रक भरधाव जात असताना पोलिस यंत्रणेची मदत घेऊन अधिकारी कारवाईचे धाडस का करीत नाही. या मार्गावरील एका तहसीलदाराशी यासंदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी यासंदर्भात कुठलेही मत व्यक्त केले नाही.
शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला इशारा
शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते यांनी उपविभागीय अधिकारी चिमुर यांना निवेदन देऊन स्पष्ट केले की, महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. कानपा, शंकरपूर, भिसी मार्गाने रेतीचे ओव्हलोड ट्रक भरधाव जात असून, चोरीबरोबरच प्रदूषणही करीत आहे. त्यामुळे यावर पायबंद घालावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.