नागपूर : राज्यातील महसूल विभागाचे अधिकारी सोमवारी एक दिवसाच्या सामूहिक रजेवर होते. नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. यामुळे महसूल विभागाचे प्रशासकीय कामकाज खोळंबले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज अधिक प्रमाणात प्रभावित झाले.
शेतजमिनींशी संबंधित कामे, प्रमाणपत्रे वितरणावर सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. अधिकारी संपावर असल्याने त्यांच्या कक्षात शुकशुकाट दिसून आला. ग्रेड पे वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यात मागण्या मान्य न झाल्यास ३ एप्रिलपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.
राज्यातील नायब तहसीलदारांना १९९८ मध्ये ‘राजपत्रित अधिकारी वर्ग ब’ चा दर्जा मिळाला. मात्र, आजही वर्ग ३ पदाचा ४,३०० रुपये ग्रेड पेनुसारच वेतन मिळते. ग्रेड पे वाढवून तो इतर विभागातील समकक्ष राजपत्रित वर्ग २ पदाच्या ग्रेड पे इतका म्हणजे ४,८०० रुपये करण्याची अधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठीच आजचे सामूहिक रजा आंदोलन केले जात आहे. यात नागपूर विभागातील सुमारे ५०० अधिकारी सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाढीव ग्रेड पेच्या मागणीसाठी आजवर अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र मागणी पूर्ण होऊ शकली नाही. आता निकरीचा लढा देण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. यापूर्वी बक्षी समितीने अनुकूल अहवाल दिला. मात्र, त्यानंतरही सुधारित वेतन लागू करण्यात आले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही आंदोलनात उतरावे लागले आहे.