लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : रेवराल-माैदा मार्ग महत्त्वाचा असून, या मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या मार्गावरील प्रवास धाेकादायक झाला आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही केली जात आहे.
हा मार्ग माैदा तालुक्यातील धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारभा, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली या महत्त्वाच्या गावांसह एकूण २५ गावांना जाेडला आहे. माैदा तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरुस्ती फार कमीकेली जाते. त्यात रेवराल-माैदा मार्गाचाही समावेश आहे. दुरुस्तीअभावी या राेडवर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्ड्यांमधून वाहने गेल्यास वाहनांचे नुकसान हाेत असून, खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचा वाहनांवरील ताबा सुटत असल्यााने अपघात हाेत आहेत.
या मार्गावर दुचाकी स्लीप हाेऊन त्यात जखमी हाेण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. या मार्गावरील माैदा-सुंदरगाव दरम्यानच्या राेडच्या रुंदीकरण व डांबरीकरणकला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, ते काम मध्येच बंद करण्यात आले असून, अद्यापही सुरू करण्यात आले नाही. येथील डांबरीकरणे दाेन्ही बाजूंनी दबले असल्याने राेड उंच सखल झाला आहे. त्यामुळे छाेट्या चारचाकी वाहनांचा खालचा भाग (इंजिन) राेडच्या उंंचवट्यांना लागत असल्याने एकीकडे वाहनांचे नुकसान हाेत आहे तर दुसरीकडे गिट्टीवरून दुचाकी स्लीप हाेत असल्याने अपघताही हाेत आहेत. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
...
आंदाेलनाचा इशारा
मांगली (तेली) ते आजनगाव दरम्यानचा राेड खड्ड्यांमुळे अधिक धाेकादायक झाला आहे. चारभा, पिपरी, सुंदरगाव, मांगली (तेली) येथील नागरिक रोज कंपनीत कामाला जाण्यासाठी व कामावरून घरी परत येण्यासाठी तसेच तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, शासकीय व खासगी दवाखाने, बॅंकेसह इतर कार्यालयीन कामांसाठी माैद्याला याच मार्गाचा वापर करतात. या मार्गाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आराेप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गाेडबाेले यांच्यासह नागरिकांनी केला असून, आंदाेलनाचा इशाराही दिला आहे.