- वेग मर्यादेचे फलकच नाहीत अन् फाडले जात आहेत चालान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्याने रहदारीसाठी सज्ज झालेल्या कन्हान-सिवनी एनएच ७ महामार्गावर गतीरोधाचा उलटाच डाव वाहनचालकांवर पडतो आहे. या महामार्गावर वेग मर्यादेचे कुठलेच फलक नाहीत. शिवाय, वाहनाचा वेग जास्त असो वा कमी. जसे वाटेल तसे चालान वाहनचालकांना भरावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या महामार्गाचे काम दीर्घकाळापासून सुरू होते. आता मात्र, हा मार्ग सज्ज झाला आहे. महामार्गाला लागून असलेल्या गाव-खेड्याच्या स्पॉटवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. दूरवरून वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना हे गतिरोधक दिसत नाहीत. शिवाय, अशा स्पॉटच्या दोन्ही अंगाला वेग मर्यादेचे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्याचा फटका वाहनचालकांना बसतो आहे. असाच फटका काही टॅक्सी चालकांना बसला आहे. पवनीच्या पुढे कांद्री शिवारातून ७४ प्रति किमी वेगाने आल्यामुळे एक हजार रुपयाचे ई-चालान भरावे लागले आहे. विशेष म्हणजे, चालान कापलेल्या या भागात वेग मर्यादा ५० केएमपीएच एवढी दर्शविण्यात आली आहे. शिवाय, हा महामार्ग पार करण्यासाठी गावांमध्ये फुट ओव्हर ब्रिज उभारण्यात आले आहे. देवलापारच्या पुढे एका टोलनाक्याजवळ खासगी टॅक्सीचा वेग कमी करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे, चालक वाहनाचा वेग कमी करण्यास आपसुकच बाध्य होतात. तरीदेखील येथे तैनात कर्मचारी टेकडीच्या जवळ वराडा आणि कांद्री शिवारात वाहनाचा वेग कमी करण्यापेक्षा राजस्व वसूल करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येते. दीर्घकालीन लॉकडाऊननंतर खासगी टॅक्सीचालकांनी वाढत्या दराचे डिझेल भरून वाहन चालविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा तऱ्हेच्या सक्तीने त्यांचा संपूर्ण नफा दंड स्वरूपात निघून जातो. एनएचआयची गती कमी करण्यासाठी संबंधित स्थानांवर बॅरिकेड्स लावले जावे, अशी मागणी टॅक्सीचालकांची आहे.
................