चंद्रशेखर बावनकुळे : मुख्यमंत्र्यांचा काटोल, नरखेड दौरा स्थगित लोकमत न्यूज नेटवर्क काटोल/नरखेड : हेलिकॉप्टरमध्ये ऐनवेळी बिघाड निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काटोल व नरखेड दौरा व नरखेड येथे आयोजित करण्यात आलेली आढावा बैठक स्थागित करण्यात आली असून, ही बैठक पुढील आठवड्यात घेतली जाईल. सदर दौरा आणि बैठकीची तारीख नंतर घोषित केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल व नरखेड येथे वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी गडचिरोली व नरखेड येथे आढावा बैठकींचे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते नरखेड तालुक्यात लांडगी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी, सावरगाव येथे जलयुक्त शिवार कामाची पाहणी, सिप्पी खापा तलावाची पाहणी व गाळयुक्त शिवार कामाची पाहणी करणार होते. त्यानंतर ते नरखेड येथे आढावा बैठकीत मार्गदर्शन करणार होते. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्यांना नरखेड येथे वेळेवर पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे सदर दौरा स्थगित करण्यात आला. यावेळी माजी आ. आशिष जयस्वाल, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, काटोल, नरखेडचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आगमनासाठी काटोल येथील स्टेडियमच्या मैदानवर हेलिपॅड तयार करण्यात आले होते. शिवाय, पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हेलीपॅडजवळ डॉ. प्रेरणा बरोकर, रमजान अन्सारी, सुभाष जयस्वाल, गळपुऱ्यात आ. डॉ. आशिष देशमुख, मारोतराव बोरकर, नितीन डेहनकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आढावा बैठक पुढील आठवड्यात
By admin | Published: May 13, 2017 2:43 AM