लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौरांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली आहे. विविध समस्यांबाबत समितीमार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आढावा घेतला.
आरोग्य समिती सभापती महेश महाजन, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन राजेश भगत, स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, भाजप अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड, सफाई कर्मचारी प्रतिनिधी जयसिंग कछवाह, सतीश डागोर, प्रकाश चमके, सुनील तांबे, किशोर मोटघरे, विशाल मेहता आदी उपस्थित होते.
२० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या या सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा महत्त्वाचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. स्थायी झालेल्या सर्व ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश महापौरांनी बैठकीत दिले होते. याबाबत प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची विस्तृत माहिती त्यांनी जाणून घेतली.