नागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत मोहाडी तालुक्यामधील ५८ ग्राम पंचायतींच्या सरपंच व सदस्यांचा समावेश करा आणि त्यानंतर तीन महिन्यात कायद्यानुसार निवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले.
तुमसर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी २० मार्च २०२३ रोजी अंतिम मतदार यादी तर, २१ मार्च २०२३ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी मोहाडी तालुक्यातील मुदत संपलेल्या ५८ ग्राम पंचायतींची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या सरपंच व सदस्यांचा बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत समावेश करण्यात आला नव्हता. परिणामी, शेतकरी सदाशिव ढेंगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संबंधित ग्राम पंचायत सरपंच व सदस्यांना वगळून बाजार समितीची निवडणूक घेणे अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ही याचिका प्रलंबित असताना डिसेंबर-२०२३ मध्ये संबंधित ग्राम पंचायतींची निवडणूक झाली. न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वरील निर्देश दिले.