()
भाग (७) लोगो घ्यावा
नागपूर : जिल्हा परिषदच्या ३२ शाळांचा पट हा ० ते ५ एवढा आहे. या शाळांचे समायोजन झाल्यास त्या बंद होण्याची शक्यताच अधिक आहे. २०१८ मध्ये भरतवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचीही अशीच दुरवस्था होती. शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याची मानसिकताही बनविली होती; पण ऑनलाईन बदलीत सहा. शिक्षिका मनीषा उईके यांची येथे बदली झाली आणि शाळेला संजीवनी मिळाली.
सध्या त्यांच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापिकेचा प्रभार आहे. ३० मे २०१८ रोजी त्यांची भरतवाड्याच्या शाळेत बदली झाली. सहा. शिक्षिका म्हणून त्यांनी प्रभार स्वीकारल्यावर पटावर एकच विद्यार्थी बघून त्यासुद्धा गोंधळल्या होत्या. गावात कुणाशी ओळख नाही, त्यातच विनापटाची शाळा; पण हे आव्हान त्यांनी संधी म्हणून स्वीकारले. २०१८ चा अख्खा उन्हाळा शाळेत घालविला. शाळेत विद्यार्थी न येण्याची कारणे शोधली. गावातील विद्यार्थी गावाबाहेरच्या शाळेत का गेली याचा उलगडा झाल्यानंतर पालकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासंदर्भात प्रोत्साहित केले आणि २०१८-१९ सत्राच्या अखेरपर्यंत १५ विद्यार्थी दाखल झाले. त्यांची शिकविण्याची पद्धत, शाळेप्रति दाखविलेले समर्पण यामुळे गावकऱ्यांच्या विश्वास वाढला आणि २६ जून २०१९ ला त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढून २५ झाली. या सत्रात त्यांच्या शाळेचा विद्यार्थ्यांचा पट ६० वर पोहोचला आहे.
- कोरोनाच्या काळातही गावात सुरू ठेवली शाळा
२०२० च्या सत्रात कोरोना आला. शाळा बंद झाल्या. शिक्षकांना वेगवेगळी कामे देण्यात आली. या मॅडमने अख्ख्या कोरोनाकाळ गावात घालविला. घरोघरी सर्वेक्षणाचे काम करताना विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन अभ्यास घेणे सुरू ठेवले. त्यांची शाळा १ ते ५ वर्गाची. आजच्या घडीला १ ते ५ च्या सर्वच शाळा बंद आहेत; पण मॅडमची धडपड बघून गावकऱ्यांनीच स्वमर्जीने संमतीपत्र दिले. शाळेत विद्यार्थ्यांना स्वत: पाठविले. त्याही रोज २५ किलोमीटरची पायपीट करीत नियमित शाळेत जातात. गावकरी त्यांच्या पाठीशी आहेत, पालक समाधानी आहेत.
- विद्यार्थी गावाबाहेर जाऊच दिला नाही
गावातील विद्यार्थी येथेच शिकावा यासाठी स्वत: नर्सरी, केजी-१ सुरू केले. एका खासगी शिक्षिकेला नियुक्त केले. फीच्या माध्यमातून, स्वत:च्या पगारातून त्या शिक्षिकेला मानधन दिले. नर्सरीत मुले दाखल झाली. त्यांचे केजी-२ झाल्यानंतर पहिल्या वर्गात त्यांनी शाळेतच प्रवेश घेतले. आजच्या परिस्थितीत गावातील १ ते ५ चा विद्यार्थी गावाबाहेरील शाळेत जात नाही. विशेष म्हणजे आज शाळेला जिल्हा परिषदेतूनही सन्मान मिळतो आहे.
- खरं तर १ पट असलेली शाळा चालविणे आव्हान होते. ते आव्हान संधी म्हणून स्वीकारले. कामात सातत्य ठेवले. समर्पणवृत्तीने काम केले. त्यामुळे आज एकीकडे १ ते ५ च्या शाळा बंद असताना गावकऱ्यांनी मुले स्वमर्जीने शाळेत पाठविली आहेत, हेच माझ्या कामाचे फलित आहे.
मनीषा उईके, प्रभारी मुख्याध्यापिका, भरतवाडा जि.प. प्रा. शाळा