लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत या आयोजनाबाबत माहिती दिली. स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या दाम्पत्याला आतापर्यंत भारतरत्न मिळायला हवा होता. आता तरी उशीर न करता फुले दाम्पत्यास हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी त्यांनी केली. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून क्रांतियात्रेला सुरुवात होणार आहे. चंदननगर, क्रीडा चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा रोड, उदयनगर, जुना सुभेदार व सक्करदरा मार्गे होत रेशीमबागच्या सभागृहात सकाळी ११ वाजता यात्रेचा समारोप होईल. या क्रांतियात्रेत ६० चित्ररथांचा समावेश राहणार असून यातून महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आदी समाजसुधारकांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविले जाईल. पत्रपरिषदेत महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, गिरीश पांडव, शकील पटेल आदी उपस्थित होते.ओबीसीमध्ये मराठ्यांच्या समावेशाला विरोधमराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश आम्हाला मान्य नाही, असे बबनराव तायवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे व त्यामानाने आरक्षणाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यामुळे सरकारने मराठ्यांसाठी स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करावी. ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट होऊ देणार नाही व त्याचा जाहीर विरोध करू, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नागपूरला येणाऱ्या कमिटीला याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.