संदीप दाभेकर
नागपूर : संत्रानगरीतील शास्त्रज्ञ डॉ. कविता पांडे यांनी धातूचे आयुष्य तिप्पट करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे यंत्रांच्या देखभालीचा खर्च कमी होणार आहे. सध्या टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज व निर्लेप या बलाढ्य उद्योग समूहांद्वारे सदर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
यंत्रांच्या भागांची झीज ही उद्योजकांपुढील मोठी समस्या आहे. धातू वेगात झिजल्यास यंत्रे अल्पावधीतच निरुपयोगी होतात, तसेच यंत्रांच्या देखभालीचा खर्च वाढतो. परिणामी, उद्योग आर्थिक अडचणीत सापडतात. डॉ. पांडे यांचे तंत्रज्ञान या समस्येवर प्रभावी उपाय ठरले आहे. हे तंत्रज्ञान व्यापक स्वरूपाचे आहे. त्यामध्ये धातूवर थर्मल प्रक्रिया केली जाते. याशिवाय ही प्रक्रिया सिरॅमिक व पॉलिमरिक घटकांवरदेखील केली जाऊ शकते. परिणामी, विविध उद्योगात या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. प्रोस्थेटिक इम्प्लांट उद्योगासाठीदेखील हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. हे तंत्रज्ञान केवळ धातूचे आयुष्य वाढवत नाही तर, त्याला अतिरिक्त स्थिरताही प्रदान करते. ही बाब प्रोस्थेटिक इम्प्लांट उद्योगांच्या उपयोगाची आहे. पांडे यांनी या तंत्रज्ञानासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत करार केला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे, तसेच १२ लाख ५० हजार रुपये निधी दिला आहे. डॉ. पांडे यांनी नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एम.एस्सी. (रसायनशास्त्र) तर, व्हीएनआयटी येथून पीएच.डी. पदवी मिळविली आहे.
अशी सुचली कल्पना
डॉ. पांडे यांना स्विस घड्याळींच्या उत्पादनाची माहिती वाचताना या तंत्रज्ञानाची कल्पना सुचली. स्विस घड्याळे अचूकता व टिकाऊपणासाठी ओळखली जातात. ही घड्याळे बनविण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे गीअर्स एका हंगामासाठी बर्फाच्या पिशव्यांमध्ये ठेवले जातात. त्यानंतर त्यांचा घड्याळीत उपयोग केला जातो.