नागपूर : रीवा-इतवारी-रीवा रेल्वेगाडीला प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी भंडारा रोड रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नुकतीच खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा रोड रेल्वेस्थानकावर या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून या सुविधेचा शुभारंभ केला. यामुळे भंडारा रोड रेल्वेस्थानक क्षेत्रातील प्रवाशांना रीवासाठी थेट रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाला दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नमिता त्रिपाठी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रवीश कुमार सिंह उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २ एप्रिल २०२३ पासून रेल्वेगाडी क्रमांक ११७५४ भंडारा रोड स्टेशन येथे सकाळी ६.१० वाजता येऊन ६.१२ वाजता सुटेल. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ११७५३ भंडारा रोड स्टेशन येथे सायंकाळी ७.२४ वाजता येऊन ७.२६ वाजता सुटेल.
भंडारा रोड स्टेशनवर प्रवाशांना सौंदर्यीकरण केलेले आकर्षक प्रवेशद्वार, वेटींग रुम, प्लॅटफार्म, रिटायरिंग रुम, दिव्यांगांसाठी शौचालय, उच्च गुणवत्तेचे साईनबोर्ड, इंटरनेटची ५ जी कनेक्टिव्हिटी, पायदळ मार्ग, पार्किंगची सुविधा, शुद्ध पेयजल, आरामदायी खुर्ची आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.