शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घ्या : पालकमंत्री बावनकुळे यांचे निर्देशनागपूर : पॉवरग्रीडने टॉवरचे काम करावे. कामाला कुणाचा विरोध नाही. पण काम सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा मोबदला द्या. प्रत्येक शेतकऱ्याला किती मोबदला मिळणार, याची सविस्तर माहिती असलेली नोटीस द्या आणि शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे आधी मागे घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पॉवरग्रीड व्यवस्थापनाला दिले. गुन्हे मागे घेण्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मान्य केले.रविभवन येथे आयोजित बैठकीत सावनेर तालुक्यातील मंगसा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत सांगितले की, शेतीचा मोबदला न देता पोलीस संरक्षणाच्या नावाखाली धाक दाखवून पॉवरग्रीडकडून कामे केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. आम्हाला शेतीचे किती पैसे मिळणार, हेही अजून सांगितले नाही. पोलिसांची दहशत निर्माण करून पॉवरग्रीड काम करीत असल्याचे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी पॉवरग्रीडच्या व्यवस्थापनाला चांगलेच तासले. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यापूर्वी त्यांना शेतीचा मोबदला द्यावा लागतो. कायद्यानुसार जे योग्य असेल ते आधी करा नंतर कामे करा. अनेक शेतकरी पोलिसांच्या धाकाने भूमिगत झाले असल्याची माहितीही शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पॉवरग्रीडने कोणतेही पत्र दिले नाही. शेतकऱ्यांची नेमकी किती जमीन जाणार, त्यांना झाडांचे, जमिनीचे किती पैसे मिळणार, पॉवरग्रीड किती पैसे आधी देणार, अशी सर्व माहिती असलेली नोटीस प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. जोपर्यंत अशी नोटीस शेतकऱ्यांना दिली जात नाही तोपर्यंत कोणतेही पोलीस संरक्षण पॉवरग्रीडला दिले जाणार नाही तसेच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)
आधी मोबदला द्या, नंतर काम करा
By admin | Published: April 16, 2017 1:49 AM