मोरेश्वर मानापुरे
नागपूर : यंदाच्या हंगामात पर्जन्यमानात घट झाल्याने विदर्भात धान पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली. त्यातच विविध रोगांचा प्रादुर्भावही झाला. यामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार मुख्य धान उत्पादक जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धानाचे पीक कमी आले आहे. राईस मिलवर धानाचा उतारा कमी असल्यामुळे यावर्षी तांदळाचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत कमीच होण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा तांदळाच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
पूर्व विदर्भात धानाचे पीक मुख्य आहे. मात्र, यंदा पाऊस कमी पडला. ऐन रोवणीच्या काळातच पाऊस लांबल्याने रोवण्या वेळेवर झाल्या नाहीत. अनेकांचे पऱ्हे सुकले. याचा परिणाम धानाच्या उत्पादनावर झाला आहे. खताच्या किमती वाढल्यामुळे उत्पादनाचा हेक्टरी खर्च वाढला. पूर्वीच्या एकरी १८ हजारांच्या तुलनेत असलेला खर्च २६ हजारांवर गेला. यावर्षी धान कमी असल्यामुळे गेल्यावर्षीच्या २,२०० च्या तुलनेत यंदा किंमत प्रतिक्विंटल २,४५० रुपयांवर गेली आहे.
उतारा ५० टक्केच
यंदा धानाचा उतारा ५० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे यंदा सर्व तांदळाचे दर प्रतिकिलो पाच ते सात रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी पडल्याने धान भरला नाही. त्यामुळे उतारा घटला. यंदा मुहूर्तावर धानाला प्रति क्विंटल २,४५० रुपये भाव मिळाला. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात धानाला जास्त भाव मिळत असल्यामुळे या राज्यातील शेतकरी विदर्भात धान विक्रीला आणत नाहीत. काही दिवसांतच भाववाढीची शक्यता असून, नवीन तांदळाची ग्राहकी सुरू झाली आहे.
बासमती तांदळात तेजी
बासमती तांदळाच्या भावात प्रतिकिलो १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. अमृतसर, रूद्रपूर (उत्तराखंड) आणि दिल्ली येथून बासमती तांदूळ विक्रीला येतो. भाववाढीमुळे दर्जानुसार भाव ९० ते १३० रुपये किलो आहेत.