रामटेक : कारमधून आलेले अज्ञात चाेरटे शेतातून तीन शेळ्या व दाेन बाेकड चाेरून नेताना आढळून आले. दरम्यान, शेळीपालकाने गावकऱ्यांच्या मदतीने चाेरट्याचा पाठलाग केला असता, आराेपी कार साेडून पळून गेले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलेवाडा शिवारात रविवारी (दि.२७) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
कमलाकर चिंधूजी गेडेकर (३७, रा. भिलेवाडा, ता. रामटेक) यांची भिलेवाडा शिवारात शेती असून, शेतात त्यांच्या मालकीच्या तीन शेळ्या व दाेन बाेकड चरत हाेते. दरम्यान, एमएच-४९/एफ-१२३७ क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून आलेले अज्ञात चाेरटे त्यांच्या शेळ्या व बाेकड चाेरून नेताना आढळले. गेडेकर यांनी लगेच गावकऱ्यांच्या मदतीने चाेरट्यांचा पाठलाग केला असता, आराेपींनी कार साेडून पळ काढला. याप्रकरणी गेडेकर यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी आराेपी कारचालकाविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक गजानन उकेबाेंद्रे करीत आहेत.