लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अलिकडे कॅम्पसमध्ये दिसणारे वातावरण निराशाजनक आहे. जामिया आणि जेएनयूसारख्या विद्यापीठामध्ये दिसणारे वातावरण देशासाठी फारसे पोषक नाही. येथील शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न उजव्या विचारसरणीकडून होत आहे, असा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी केला.गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने सोमवारी विदर्भ छात्र संसद या उपक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी वंजारी होत्या. प्रमुख पाहुण्या आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस, साहित्यिक अच्युत गोडबोले, संस्थेचे सचिव अभिजित वंजारी, स्मिता वंजारी होत्या.सुश्मिता देव म्हणाल्या, आमचे शैक्षणिक कॅम्पस सुरक्षित नाही. जेएनयु विद्यापीठामध्ये शुल्क वाढल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी कुणावरही गुन्हे दाखल केले नाही, कुणाचे बयानही घेतले नाही. आंदोलनात दोन महिने क्लासेस झाले नाही. मात्र विद्यार्थ्यांनीच क्लासेस होऊ दिले नाही, असे चित्र रंगविण्यात आले. ई-मेल आणि व्हॉट्सअॅप वरून परीक्षा घेण्याच्या व्हॉईस चान्सलरच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी विरोध केला. या आंदोलनाच्या आड विद्यापीठामध्ये उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींना भरती करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.युवकांना आवाहन करून त्या म्हणाल्या, मतदानाचा अधिकार ही लोकतांत्रिक ताकद आहे. देशाच्या भविष्याला दिशा देण्यासाठी त्याचा उपयोग करा. संस्थेने घेतलेल्या विदर्भ छात्र संसद या उपक्रमातून विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.चारुलता टोकस म्हणाल्या, एकेकाळी संधी मर्यादित होती. आता जग बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग साधा, जगासोबत राहा. अच्युत गोडबोले म्हणाले, तंत्रज्ञानात मागील ११ वर्षात बराच बदल घडला आहे. या बदलामुळे अनेकांचे जॉब गेले. त्यामुळे विचार करून करिअर निवडा. यश म्हणजे पैसा, गाडी बंगला नव्हे, तर सामजिक जाणिवा ठेवून आपल्याला हवे त्यात आनंदाने काम करायला मिळणे, हे खरे यश आहे. यावेळी डॉ. सुहासिनी वंजारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अभिजित वंजारी यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भभरातील महाविद्यालयातून विद्यार्थी उपस्थित होते. दिवसभर चार सत्रात ही संसद चालली. यात विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.मुलींनो, अत्याचार खपवून घेऊ नका - प्रणिती शिंदेहिंगणाघाट येथील घटनेचा उल्लेख करून तरुणी आणि महिलांना आवाहन करून आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महिलांनी यापुढे अत्याचार खपवून घेऊ नयेत. समाज काय म्हणेल याचा विचार करत घरात बसू नका. दडपणात न येता पोलिसात जा. तरुणांनी आणि पुरुषांनी आपण महिलांना किती आधार देतो, याचा विचार करावा. महिलांचे रक्षण करतो, तोच खरा पुरुष असतो. महिलांनाही बरोबरीने जगण्याचा अधिकार द्या, असे आवाहन त्यांनी केले. स्मार्ट सिटीपेक्षा स्मार्ट व्हिलेज व्हावेत. खेड्यातच अधिक टॅलेंट आहे. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचा केंद्रबिंदू व्हावे. गावांना स्वावलंबी बनवावे. संविधान, लोकशाहीला धोका होत असताना आणि संस्कृतीला ठेच पोहचत असताना आपण गप्प बसणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
निवड चुकली तर आयुष्याची दिशा चुकते - बच्चु कडूउद्घटनानंतरच्या सत्रात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. ते म्हणाले, चांगले वाईट निवडता आले नाही तर आयुष्याची दिशा चुकते. राजकारणाची परिभाषा आता बदलली आहे. जात, धर्म पाहून मतदान होत असल्याने देशाचे वाटोळे झाले आहे. त्याला जबाबदार मतदारही आहेत. त्यामुळे देश आणि समाज घडविण्यासाठी सुज्ञपणाने वागा. समाजातील दु:खाचा शोध घ्या.पुरके यांच्या उपस्थितीत समारोपदिवसभरातील चार सत्रांनंतर माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या उपस्थितीत समारोप झाला. २१ विद्यार्थी वक्त्यांनी सत्रात अभ्यासपूर्ण मते मांडली. ११ जिल्ह्यातील १५० महाविद्यालयांमधून शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.