नागपूर : आधी सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळत नव्हती. माहितीचा अधिकार कायद्यामुळे ही समस्या दूर झाली. हा एक प्रभावी कायदा आहे. या कायद्याचा केवळ जनहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे, असे मत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवारी ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सध्या अनेक जण वाईट हेतू साध्य करण्यासाठी या कायद्याचा उपयोग करीत आहेत. अशा प्रवृत्तीवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक जण विविध माहितीसाठी दरवर्षी हजारो अर्ज दाखल करतात. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाला मनस्ताप सहन करावा लागतो. औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या १३ व्यक्तींनी वेगवेगळ्या विभागांमध्ये आठ हजारावर अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, एका व्यक्तीने किती अर्ज दाखल करावे, यावर मर्यादा आणणे आवश्यक झाले आहे, असेही पांडे यांनी सांगितले.
याप्रसंगी आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव, कक्ष अधिकारी नंदकुमार राऊत, दीपाली शाहारे, माहिती विभागाचे माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.