योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भातील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते.
मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. हातवण व बापफळ शिवारातील २०४ हेक्टर व ११८ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली.