नागपूर : मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात सूर्याचा ताप अधिक वाढताे. मात्र अवकाळी पाऊस आणि आकाशात ढगांच्या गर्दीने नागपूरचे वातावरण सुखद केले आहे. शहराचे कमाल तापमान सामान्यापेक्षा ८ अंश खाली २९.४ अंश नाेंदविण्यात आले आहे, जे विदर्भात सर्वात कमी आहे. नागपूरसह आसपासच्या परिसरात २३ मार्चपर्यंत आकाशात ढग दाटलेले असतील आणि पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ व आसपासच्या भागात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे, ज्यामुळे अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. २० मार्चपर्यंत उत्तर-पूर्व भारतात वेस्टर्न डिस्टरबन्स तयार हाेणार आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. नागपुरात गुरुवारी सकाळी व रात्री मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू हाेता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत ९.९ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. सकाळी आर्द्रता ८० टक्के हाेतील. ढग दाटलेले असल्याने सायंकाळपर्यंत ७२ टक्के आर्द्रता नाेंदविण्यात आली. आकाशात दिवसभर काळे ढग दाटलेले हाेते.
दरम्यान विदर्भात अमरावती व गाेंदियामध्ये १.८ मिमी, यवतमाळमध्ये १ मिमी पाऊस पडल्याची नाेंद करण्यात आली. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पारा ४ ते ५ अंशाने घसरला. आकाशात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भातील हवामान बदलले आहे.